दिल्लीत झालेल्या ‘भाजप’ च्या पराभवा बद्दल शरद पवारांचे मोठे ‘विधान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीमध्ये पुन्हा आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहेत. त्यामुळे इतर पक्षांनी देखील या निकालावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालाबाबत बोलताना हा केवळ दिल्लीचा विजय नसून याचे परिणाम इतर राज्यांवर देखील दिसून येणार असल्याचे म्हंटले आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले तसेच आप चा विजय होणार असाच कौल होता असे म्हंटले आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झाली आहे आणि ती आता थांबणार नाही असे मत पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच भाजपने धार्मिक गोष्टींचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी ते मान्य केले नाही त्यामुळे हा त्यांच्या अहंकाराचा परिणाम असल्याचे देखील पवारांनी यावेळी सांगितले.

सकाळी आठ वाजल्यापासून दिल्लीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली होती. यामध्ये आपला स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे इतर पक्षांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातून शिवसेनेचे अनिल परब यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. आपची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असं अनिल परब म्हणाले होते.