उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहतंय, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे ‘कौतुक’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची राज्यातील स्थिती आणि त्यावर राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक देखील केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. उद्धव ठाकरे समोर येऊन सर्वांना दिलासा देत आहेत. उद्धव ठाकरेंकडे राज्य मोठा भाऊ म्हणून पाहात आहे. आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी आपल्याशी बोलत आहे, असे लोकांना वाटतं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच सरकारवर कोणी टीका करत असेल तरीही मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे आपला फोकस बदलायचा नाही. ज्यांना टीका करायची आहे त्यांना करु द्या… त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल, असा टोला सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला.

सुप्रिया सुळे यांच्या संभाषणातील ठळक मुद्दे
1. विद्यार्थ्यांनी या वेळेकडे बोनस टाईम म्हणून पहावा, अभ्यास करावा
2. अनलॉकिंगसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून प्रक्रिया सुरु करावी
3. अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतात
4. कोणीही खोट्या बातम्या व्हायरल करू नयेत
5. लस येण्यासाठी अजून काही महिने जातील
6. प्रशासन पूर्णवेळ काम करत आहे याचा अभिमान आहे
7. शहीद पोलिसांना श्रद्धांजली
8. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांना सरकारकडून छोटीशी मदत म्हणून घरात एक नोकरी आणि 50 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
9. अनलॉकिंगची तुमची इच्छा आहे तशी माझीही आहे
10. सर्वांनी हात धुवावेत, मास्क लावावेत
11. माझ्या आईने यूट्यूबर बघून मास्क बनवले आहे. तेच मी वापरणार आहे.