सरकार स्थापनेसाठी राज्यपालांसमोर ‘हे’ आहेत पर्याय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपाने ठरविले असल्याने आता महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्य स्थितीत राज्यपालांसमोर कोण कोणते पर्याय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. जर येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापनेचा निर्णय झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची आवश्यकता आहे.

राज्यपाल यांच्यासमोर दोन ते तीन पर्याय आहेत. त्यात पहिला पर्याय म्हणजे भाजपाला बोलावून त्यांना सत्ता स्थापन करण्यास सांगून बहुमत सिद्ध करायला सांगणे. पण भाजपाने त्याला नकार दिल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आमदार असलेल्या शिवसेनेला बोलावून ते सरकार बनविण्यास तयार आहेत का याची विचारणा शिवसेनेच्या विधीमंडळ नेत्यांकडे विचारणा करावी लागेल. तसेच त्यांच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे, याची विचारणा करावी लागेल. जर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकेल असे राज्यपालांना वाटले तर ते त्यांना सरकार बनविण्यास सांगू शकतात. तसेच शपथविधीनंतर १५ दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात. त्याचवेळी ते तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांना बोलावून त्यांची भूमिका समजावून घेतील.

जर कोणीच सरकार बनवू शकत नाही आणि राज्यात बहुमताचे सरकार येऊ शकत नाही. असे राज्यपालांचे मत बनले तर ते केंद्र सरकारला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करु शकतील.

असे तीन पर्याय सध्या राज्यपालाकडे आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे भाजपा सरकार बोलविण्यास पाचारण करणे. हा पर्याय भाजपाने न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यपालाकडे आता दोनच पर्याय आहेत. एक तर शिवसेनेला शपथविधीसाठी पाचारण करणे किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणे.

Visit : Policenama.com