‘शिवसेना बेईमान होऊ शकते वाटलं नाही’; मुनगंटीवार म्हणाले – ‘…तेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा प्रलय नक्कीच होईल’

मुंबई : प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही. जनतेच्या हिताविरोधी राजकारण होत असेल तर शक्तीने लढावे लागेल. तत्परतेने पुढे जावे लागेल. पण जेव्हा सुडाचे राजकारण वाढते तेव्हा सत्तेचा प्रलय नक्कीच होत असतो, असे सूचक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा केले आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारच्या चुकांचे वजन भरले असल्याचे समजून चाला, असेही ते म्हणाले.

राज्यात सत्तांतरावरून विरोधकांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच सुधीर मुनगंटीवार यांनी आता पुन्हा एकदा सत्ता बदलावर विधान केले आहे. राज्यातील सत्तापालट निश्चित असून, जनहितविरोधी सरकार टिकवणे ही सर्वांत मोठी घोडचूक आहे. शुभ कार्य कधी ना कधी व्हायचे. आता ठाकरे सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. तीन महिन्यांचे चार महिने होतील, पण हे सरकार टिकवणं घोडचूक आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, वीजबिलावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा नाही. एखादा प्रश्न उपस्थित केला तर मोहन डेलकरांची आत्महत्या सांगायची, हे सरकार टिकवणं हेदेखील राजकीयदृष्ट्या आमची घोडचूक आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना बेईमान होऊ शकते वाटलं नाही

राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेचे 161आमदार निवडून दिले. पण शिवसेनेने बेईमानी केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती, ती अशाप्रकारे बेईमान होऊ शकते हे आमच्या लक्षात आले नाही, असेही ते म्हणाले.