‘शाहीन बाग’चे आंदोलक काश्मीरमधील दहशतवाद्यांचे समर्थक : योगी आदित्यनाथ

दिल्ली : वृत्तसंस्था- दिल्लीतील आपचे केजरीवाल सरकार हे शाहीनमधील आंदोलकांना बिर्याणी पुरविते. हे आंदोलक काश्मीरमधील दहशतवादास पाठिंबा देणारे आहेत, अशी जहरी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीतील रोहिणी परिसरात एका निवडणूक रॅलीत केली.

महिला, मुलांसह शेकडो आंदोलक सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सला विरोध करण्यासाठी शाहीन येथे गेल्या 15 डिसेंबरपासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीतील करावाल नगर चौक परिसरात घेतलेल्या एका निवडणूक सभेत बोलताना भाजपनेते आदित्यनाथ म्हणाले की, सीएएला विरोध करणार्‍या आंदोलकांच्या पूर्वसूरींनी भारताचे विभाजन केले. म्हणूनच त्यांच्या मनात एक भारत- क्षेत्र भारत या योजनेबद्दल आकस आहे. दिल्लीतील विविध ठिकाणी होणार्‍या आंदोलनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, ही आंदोलने फक्त सीएए पुरतीच मर्यादित नाहीत तर भारत जगातील एक बलाढ्य देश कसा होईल, असा प्रश्‍न विचारणार्‍यांची ही आंदोलने आहेत. यांना बलाढ्य होऊ घातलेल्या भारत देशाची प्रगती रोखायची आहे. केंद्र सरकारविरोधातील या आंदोलनांना, आंदोलनकर्त्यांना आप सरकारची फूस आहे.

या देशविरोधी आंदोलनांचा विरोध करा, असे दिल्लीकरांना आवाहन करून योगी म्हणाले की, दिल्लीतील विविध नागरी समस्या सोडवू न शकलेल्या आपच्या सरकारला पराभूत करण्याची ही योग्य वेळ आहे. भारत देश सर्वार्थाने बलिष्ठ करणार्‍या भाजपला या विधानसभा निवडणुकीत विजयी करा. आतापर्यंत राहिलेला विकासाचा अनुशेष भाजप सरकार वेगाने भरून काढेल, असा विश्‍वास व्यक्त करून योगी म्हणाले, हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची भाजपची परंपरा आहे.