पुण्यात प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षात बसलेल्या प्रवाशाला अन्य साथिदारांच्या मदतीने भरदिवसा लुटल्याची घटना रविवारी (दि.10) दुपारी बाराच्या सुमारास ससून रुग्णालायासमोर घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढून मुसक्या आवळल्या.

रिक्षाचालक कपिल खिलारे (वय-43 रा. दत्तवाडी), विजय फक्कड ढावरे (वय- 31 रा. लक्ष्मी नगर, दत्तवाडी), अब्दुल रझाक हुसेन भोला (वय-22 रा. बाबाखान वस्ती, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील वरसगाव येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ससून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी दुपारी स्वारगेट येथून पुणे स्टेशन येथे निघाले होते. त्यावेळी रक्षाचालक खिलारे याने पुणे स्टेशन येथे सोडण्यासाठी वीस रुपये घेतो असे सांगितले. त्यानुसार तरुणाने पैसे देण्यास तयार असल्याचे सांगून रिक्षात बसले. काही अंतर गेल्यानंतर खिलारे यांचे साथीदार ढावरे आणि हुसेन रिक्षात बसले.

बाराच्या सुमारास रिक्षा ससून रुग्णालयाजवळ आली असता ढावरे आणि हुसेन यांनी फिर्य़ादी यांनी दमदाटी करून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. फिर्य़ादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक केली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com