गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील ३ जण ठार ; घर जळून खाक

वसमत : पोलीसनामा ऑनलाइन – वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात घरातील एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले. सोनाजी आनंदराव दळवी (वय ५५), सुरेखा सोनाजी दळवी (वय ५०) आणि त्यांची मुलगी पूजा सोनाजी दळवी (वय २३) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

कुरुंदा येथील सोनाजी आनंदराव दळवी यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून गळती होत असल्याने गॅस सिलेंडर वेगळे ठेवलेले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. गॅस गळती झाल्याने तो घरात पसरला होता. वीज गेल्याने त्यांनी मेणबत्ती अथवा आणखी काही पेटविण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामुळे आग लागली. त्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराची पडझड झाली असून संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला. घरातील सर्व सामान संपूर्णपणे जळून खाक झाले. अनेक वस्तूंचा कोळसा झाला आहे.

अग्नीशामक दलाने येऊन आग विझविली. मात्र तोपर्यंत सर्व काही जळून गेले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते पूर्णपणे जळून गेले होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
दळवी यांची मुलगी पूजा ही पुण्यात बी. एच. एम. एस.चे शिक्षण घेत होती.