महिला पोलिसाला ‘चकण्यासाठी शंभर ठेव’ म्हणणे आले तिघांच्या आंगलट

वसई :पोलीसनामा ऑनलाईन- वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन चकण्यासाठी शंभर रुपये ठेव,अशा अवमानकारक भाषेत महिला पोलिसावर दाखवलेली मग्रुरी तिघांच्या चांगलीच अंगलट आली आहे. हे तिघेही वसईतील रहिवाशी असून तिघा आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.विवेक सिंग, सुमित वाघरी आणि पंकज राजभर हे तिघे एक जानेवारीला बाईकवरुन ‘ट्रिपल सीट’ चालले होते.वसई रेंज नाक्यावरुन जात असताना वाहतूक पोलिसांनी त्यांना हटकलं. त्यांच्याकडे ना ड्रायव्हिंग लायसन्स होतं, ना बाईकची अधिकृत कागदपत्रं. भरीस भर म्हणजे हेल्मेटविना ते ट्रिपल सीट चालले होते.

वाहतूक पोलिसांनी पावती फाडली आणि दंड वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरण्यास सांगितलं.दुसऱ्या दिवशी हे तिघे पैसे भरण्यास गेले तेव्हा एकूण दंड ४ हजार ५०० रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तडजोडीनंतर तिघांना दोन हजार शंभर रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलिस नाईक स्वाती गोपाले यांच्याशी या तिघांनी हुज्जत घातली आणि कामात अडथळा आणत त्यांच्या दिशेने दोन हजारांची नोट भिरकावली. शंभर रुपये चकण्यासाठी ठेव, असा उद्धट शब्दप्रयोगही केला.
या विरोधात महिला पोलिस कर्मचाऱ्याने माणिकपूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माणिकपूर पोलिसांनी तिघांवर भादंवि कलम ३५३ प्रमाणे सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तणूक यासाठी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. वसई कोर्टात तिघांना हजर केलं असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.