चकमकीदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक सुरु होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सकाळी अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकीला सुरुवात झाली. यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा जवानांची टीम परिसरात सर्च ऑपरेशन करत होती अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दक्षिण काश्मीरमध्ये 29 विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याचे जम्मू- काश्मीर पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचा सामना करण्याचा आणि या संपूर्ण भागातून दहशतवाद निपटून काढण्याचा सुरक्षा दलांना पुरेसा अनुभव आहे, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

‘कोकेरनाग, त्राल आणि ख्रीव यांच्या वरच्या भागात विदेशी दहशतवादी आहेत. दक्षिण काश्मिरात सुमारे 29 विदेशी दहशतवादी कार्यरत असून, ते खाली उतरतील आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, तेव्हा आम्ही त्यांचा खात्मा करू’, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.

विदेशी दहशतवाद्यांचे आव्हान मोठे आहे की स्थानिक दहशतवाद्यांचे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दोन्हींचे आमच्यापुढे आव्हान आहे, मात्र आमची दले त्यांचा सामना करण्यासाठी पुरेशी अनुभवी आहेत. त्यांना तोंड देण्याचे कौशल्य गेल्या 25 वर्षांत आम्ही मिळवले आहे. नेमकी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. असेही पोलिसांनी स्पष्ट केले.