काय सांगता ! होय, चक्क बुटामुळं चोरटे अडकले जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – रात्रीच्या अंधारात तिघांनी कामगारांच्या खोलीत चोरी करत 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी इतर मुद्देमालासोबत खोलीमधील कामगाराच्या बुटाची एक जोड चोरून नेली. आणि याच बुटांनी चोरट्यांना पकडून दिले.

कामगारांच्या खोलीत चोरी केल्यानंतर चोरट्यांपैकी एकजण बूट घालून फिरत होता. पोलिसांनी या बुटावरूनच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने त्याच्या इतर दोन साथिदारांची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्या इतर दोन साथिदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचा 66 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चंदनझिरा पोलिसांनी नुकतीच केली आहे.

चंदनझिरा येथील सिराज पटेल यांच्या बिल्डींगमध्ये एमआयडीसीमध्ये काम करणारे 22 कामगार राहतात. शनिवारी (दि.26) कामगार झोपले असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून खोलीत प्रवेश करून कामगारांचे मोबाईल, एटीएम, रोख रक्कमेसह एक बुटाची जोड चोरून नेली. कामगारांनी चंदनझिरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

चंदनझिरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांच्या रेकॉर्डवरील एकजण गुन्ह्यात चोरलेला बुट घालून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शहरातील लालबाग येथून संशयित आकाश देवकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथिदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी शाहरुख खान व हुसेन खान उर्फ जंगली यांना अक्षरधाम स्मशानभूमी येथून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अविनाश नरवडे, नंदलाल ठाकूर, अनिल काळे, महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा गायकवाड यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/