…म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे ‘फॉर्म’मध्ये

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कधी गमतीशीर तर कधी चुकीच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आता एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाईम’च्या कव्हर पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकला. ‘टाइम’च्या कव्हर पेजवर फोटो झळकणे म्हणजे अभिनंदनाचीच बाब. मात्र, मोदींचा फोटो हा ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ या मथळयाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना ‘भारताला विभागणारा प्रमुख’ असे म्हंटल्याने सध्या तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच रावसाहेब दानवे यांनी फोटोचा विषय आणि तो का प्रसिध्द झाला हे समजून न घेताच ‘डायरेक्ट’ ‘फॉर्म’मध्ये येवुन अभिनंदनाचे ट्वीट केले. दरम्यान, काही वेळातच चूक लक्षात आल्यानंतर ते ट्वीट काढून टाकले.

‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणावाक्यासह ‘पूर्ण जगात साहेबांचा डंका’ असा उल्‍लेख देखील रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला होता. चारही बाजूंनी टिकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर दानवेंना त्यांच्याकडून झालेली चुक लक्षात आली. सदैव ‘फॉर्म’मध्ये असलेल्या दानवेंनी तात्काळ ते ट्वीट काढून टाकले. दानवेंनी ते ट्वीट त्यांच्या चौकीदार रावसाहेब पाटील दानवे या ट्विटर अकाऊंटवरून केले होते. कुठलीही, कशाचीही खातरजमा न करता अतिशय ‘फॉर्म’मध्ये येवून केलेले कृत्य किती महागात पडते याचा प्रत्यय दानवे यांना यामुळे नक्‍कीच आला असेल. यापुर्वी देखील रावसाहेब दानवे हे त्यांच्या कधी गमतीशीर तर कधी चुकीच्या विधानांमुळे ‘फॉर्म’मध्ये आले आहेत. दि. 23 मे नंतर रावसाहेब दानवे यांचा ‘फॉर्म’ कायम राहतो की आणखी काय होते हे आगामी काळात सर्वांनाच समजणार आहे.