राज ठाकरे आज पुण्यात काय गौप्यस्फोट करणार ? ; लोकांमध्ये मोठी उत्सुकता तर, भाजप नेत्यांना चिंता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार रिंगणात नसताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना सध्या संपूर्ण राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज ठाकरे हे प्रत्येक सभेत व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या स्वप्नांचे नेमके वास्तव काय आहे हे दाखवित आहेत. प्रत्येक सभेत एक मोठा गौप्यस्फोट करीत मोदींच्या कारभाराची लत्तरे वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे पुण्यासारख्या महत्वाच्या जाहीर सभेत ते आज नेमके काय बोलणार आणि कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकणार याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचवेळी ते आणखी काय पोलखोल करणार. त्याचा आपल्या मतदानावर किती परिणाम होणार याची भाजप उमेदवारांना चिंता सतावू लागली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत सत्ताधारी पक्षाविरोधात प्रचार करण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. नांदेड येथील सभेपासून त्यांचा हा दौरा सुरु झाला आहे. राज ठाकरे यांची राजकीय मांडणी आणि मुद्दे नागरिकांना थेट भिडत आहे. त्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाले असून त्यांना कसे रोखायचे याचा त्यांना प्रश्न पडला आहे. नांदेडच्या पहिल्या सभेत बालाकोटवरील एअर स्ट्राईकवर ते बोलले. ही सभा यु ट्युबवर किमान साडेतीन लाख लोकांनी पाहिली आहे.

त्यानंतर त्यांनी सोलापूर, इचलकंरजी, कोल्हापूर, सातारा येथे सभा घेतल्या. नरेंद्र मोदींनी जवानांच्या नावाने कसे मते मागत आहेत, याचा व्हिडिओ दाखवून जोरदार टिका केली. जवानांच्या नावावर मते मागणाऱ्या मोदींच्या सभेत जवानांच्या पत्नीविषयी अश्लिल बोलणारा सुधाकर परिचारक स्टेजवर असल्याचे दाखवून मोदी कसे ढोंगी असल्याचे दाखवून त्यांचा बुरखा फाडला.

अमरावती येथील हरिसाल हे गाव डिजिटल गाव झाले म्हणून भाजपने डांगोरा पिटला. पण, तो कसा फोल ठरला हे दाखवून दिले. इतकेच नाही तर त्या जाहिरातीत दाखविणाऱ्या तरुणाला थेट मंचावर सादर करुन एकच धमाका केला होता. राज ठाकरे यांचे गुरुवारी वडगाव बुद्रुक येथील फन टाईम सिनेमागृहामागील शिंदे मैदानावर होत आहे. या सभेच्या प्रचारासाठी शहर मनसेने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली असून सभेची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी सहा रथांची व्यवस्था केली आहे. स्क्रीनवरुन राज ठाकरे यांची भाषणे शहरभर दाखविली जात आहे.

प्रत्येक सभेत मोदींच्या कारभाराचा बुरखा फाडणारे राज ठाकरे नेमके आज काय बोलणार आणि कोणत्या गोष्टी बाहेर काढणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे तर भाजप नेत्यांना चिंता लागली आहे.