वर्दीतील देवदूतांनी वाचविले हार्टअटॅक आलेल्या रिक्षा चालकाचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे हार्टअ‍ॅटक आलेल्या एका रिक्षा चालकाचे प्राण वाचले आहेत. कुटूंबिय, नागरिक आणि डॉक्टरांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. अशोक राजाराम वाडेकर (वय 60, दिघी) असे प्राण वाचलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

अशोक वाडेकर हे दिघी परिसरात राहण्यास असून, पुणे शहरात प्रवाशी रिक्षा चालवितात. दरम्यान, कोरेगांव पार्क वाहतूक विभागातील कर्मचारी राहुल ढमढेरे, निनीत भागवत व विनोद कायगुडे हे दोन दिवसांपुर्वी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत परिसरात पेट्रोलिंग करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यास सांगितले होते. त्यावेळी मोबाज चौकात रिक्षातच एकजन छातीला हात लावून झोपलेला आढळून आला. त्यांनी तत्काळ दुचाकी थांबवून रिक्षामधील अशोक यांना काय झाले, याची विचारणा केली. त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. तसेच, एका रिक्षा थांबवून त्यांना काही वेळातच ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांना घेऊन जाण्यासाठी दोघांनी दुचाकीवरून पायलेटींग केली. त्यामुळे अशोक यांना घेऊन कर्मचारी काही वेळातच रुग्णालयात दाखल झाले.

डॉक्टरांना माहिती देऊन उपचार करण्यास सांगितले. तसेच, त्यांच्या मोबाईलवरून मुलाला फोनकरून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना हार्टअ‍ॅटक आल्याचे समजले. त्यांचे तीन ब्लॉकेज निघाल्याचेही सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर झाली.
उपचारानंतर अशोक यांना रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन पोलीस कर्मचारी राहुल ढमढेरे, निनीत भागवत, विनोद कायगुडे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, त्यांच्या कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/