अवघ्या 15 दिवसातच तुकाराम मुंढे यांची बदली रद्द ! आता पुढे काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कडक शिस्तीचे अधिकारी अशी ज्यांची ख्याती आहे आणि अनेक कारणांनी नेहमी चर्चेत राहणारे तुकाराम मुंढे यांची बदली राज्य सरकारनं रद्द केली आहे. केवळ 15 दिवसातच तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. यामागे नेमकं काय घडलं आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

26 ऑगस्ट रोजी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदी ही बदली करण्यात आली होती. परंतु अवघ्या 15 दिवसातच आज (गुरुवार दि 10 सप्टेंबर रोजी) त्यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. यामुळं आता सारेच अवाक् झाले आहेत. इतकंच नाही तर पोलीस दलातील भरत्यांमध्ये झालेल्या गोंधळाप्रमाणेच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गोंधळही यामुळं अधोरेखित झाला आहे.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मुदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मुंबई) सदस्य सचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तसे आदेशदेखील जारी करण्यात आले आहेत.

मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार राधाकृष्णन बी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. नागपूर पालिका आयुक्त म्हणून मुंढेंची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली आहे.