ट्रकच्या धडकेत ६ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, जमावाच्या मारहाणीत चालकाचाही मृ्त्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून घरी जाणा-या कुटुंबाच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणा-या ट्रकची धडक बसली. यामध्ये सहा वर्षाच्या ऋचा सुशांत झेंडे (रा. सांगली) हीचा जागीच मृ्त्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये ट्रक चालकाचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास सांगली-हरिपूर रस्त्यावर घडली.

ऋचा ही तिच्या काकासोबत काळी वाट भागातील घरी जात होती. चौकामध्ये वळन घेत असताना भरधाव वेगात येणा-या ट्रकची धडक दुचाकीला बसली. यामध्ये ऋचाचे काका दुस-या बाजूला फेकले गेले तर ऋचा रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णलायात नेले असता तिला मृत घोषीत करण्यात आले.

दरम्यान, ट्रक चालक कुमार आडगेकर (वय ४५, रा. हरिपूर) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने आणखी एका दुचाकीला धडक देऊन पुढे असलेल्या कमानीला जाऊन धडकला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने कुमार आडगेकर याला गाडीतून बाहेर खेचत बेदम मारहाण केली.

ऋचा हिचा मृत्यू झाल्याचे समजताच जमावाने ट्रक चालक कुमारला आणखी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार समजात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.