‘छोटा भाई – मोठा भाऊ’च्या कात्रीत अडकलो होतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला छोटा भाई म्हणत, तर देवेंद्र फडणवीस हे मला मोठा भाऊ म्हणत, या दोन भावांच्या भाऊबंदकीमध्ये मी अडकलो होतो. पण, भाऊबंदकीपेक्षा दिलेला शब्द महत्वाचा होता. त्यामुळे आजही वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामना ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

राज्यात भाऊबंदकी का झाली, हे सांगताना ठाकरे म्हणाले, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरीता जन्माला आली. मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना जेव्हा लक्षात आले की हिंदुंवर गंडातर येतंय तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगिकार केला. १९८७ मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने निवडणुक लढवून जिंकली. त्यानंतर भाजपा शिवसेनेकडे आली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन समविचारी पक्ष एकत्र आले. आमच्या हिंदुत्वात वचन देणे आणि वचन पाळणे याला अपार महत्व आहे. वचन जर मोडले जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही.
जणू आम्ही धर्म बदलला.

ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही आणि कधीही सोडणार नाही. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही धर्म बदलला आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही.

भाजपावर टिका करताना ते म्हणाले, मी काय धर्मातर केलंय आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रम्हवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व, आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झुठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्या पुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.

महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले, एक लक्षात घ्या. प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. पण दोन्ही तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत. त्यांचे उदाहरण घ्या आपापल्या राज्याचे हित, देशाचे हित या विचारांपेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचे हित करायचे नाहीत का? देशाचे हित करायचे नाही का?. देशात, राज्यात अराजक माजवायचंय का?. आणि तरीही आम्ही तुमच्या सोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. काश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का?