शासकीय रूग्णालयाचा स्लॅब कोसळल्यानं रूग्णासह महिलेचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून एका रुग्णासह महिलेचा दबून मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. देवराव बागडे (वय-66 रा. सावनेर) आणि वनिता वाघमारे (वय-39 रा. भांडेवाडी) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. टिबी वॉर्ड परिसरातील त्वचारोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागासमोरील सज्जा आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) भाग असलेल्या टिबी वॉर्ड परिसरातील त्वचारोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागासमोरील सज्जा कोसळला. याखाली दबून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या देवनाथ बागडे यांचा मृत्यू झाला. तर नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या वनिता वाघमारे यांच्या अंगावर सज्जा पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन महिला बागडे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी त्या सज्जाच्या खाली बसल्या असताना त्यांच्या अंगावर सज्जा कोसळला. त्यातच देवराव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिघांना बाहेर काढले असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर यांनी दिली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/