ACB TRAP : ‘त्या’ दोन ‘पंटरां’कडून ‘पावरबाज’ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत कार्यरत असल्याचे सांगून १ लाख ६ हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने अटक केलेल्या त्या दोन पंटरांनी गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. त्यांनी नाव घेतलेला कोणीही अधिकारी पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेत कार्यरत नाही. परंतु अनेक ‘पावरबाज’ पोलीस अधिकारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या ‘पावरबाज’ अधिकाऱ्यासाठी ते दोन पंटर वसूली करत होते याची चर्चा सध्या रंगली आहे.

तुमच्या विरोधात तक्रार दाखल आहे. ती मिटवायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील असे सांगून अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने अमित रमेश मोहीते (वय २४, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती चिखली, पुणे) आणि अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा (वय २८, रा.दगडू पाटील नगर, काळेवाडी, वाकड,पुणे) या दोघांना सापळा लावून पकडले. तक्रारदाराकडून त्यांनी ३२ हजार रोख आणि ७४ हजार रुपये बेअरर चेकने स्विकारले. चिखलीतील एका हॉटेलमध्ये दोघांना पकडण्यात आले. त्यानंतर दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हे शाखेतील ‘पवार’ नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी काम केल्याचे सांगितले आहे. परंतु पडताळणी केल्यावर पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेत ‘पवार’ नावाचा एकही अधिकारी कार्यरत नसल्याचे समोर आले. मात्र णे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ‘पावरफुल’ अधिकारी आहेत. त्यापैकी कोणासाठी त्यांनी हे काम केलं आहे का ? याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु ते दोघे नेमके कोणत्या ‘पावर’बाज अधिकाऱ्यासाठी वसूली करत होते. याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे.

एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यासंदर्भात अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, सहायक पोलीस फौजदार करूणाकर, कर्मचारी टिळेकर, गिरीगोसावी, मेहत्रे याच्या पथकाने केली.