मोटार नाल्यात पडून चालकाचा मृत्यू, भोसरीतील पाच जण गंभीर जखमी

पेण : पोलीसनामा ऑनलाईन – अलिबागमधून मजा मारुन परत पुण्याला येत असताना वाटेत मोटारसायकलला धडक दिल्याने पळून जात असताना मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार नाल्यात पडून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. भोसरीतील पाच तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात रविवारी रात्री पावणेअकरा वाजता पेणजवळील आंबेगाव येथे झाला.

इको कारमधील रिकी रामकृष्ण अग्रवाल (वय ३५), मयूर नरेश अग्रवाल (वय २५), शिवम नरेश अग्रवाल (वय १८), अनिल विनोद अग्रवाल (वय २४), शिवकुमार सियाराम प्रजापती (वय २४, सर्व रा.भोसरी, पुणे) अशी जखमीची नावे आहेत. कारचालक विशाल याचा जागीच मृत्यू झाला आहे. मोटारसायकलस्वार नितीन काशीनाथ वेताळ (रा. हटवणे, पेण) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.

याबाबत पेण पोलिसांनी सांगितले की, भोसरी येथे राहणारे तरुण रविवारची सुट्टी साधून अलिबागला मौजमजा करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा ते तेथून निघाले. सर्व जण मद्यधुंद अवस्थेत होते. येताना आंबेगावजवळ त्यांनी पुढे जाणाऱ्या एका मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलचालक खाली पडला व जखमी झाला. अपघात झाल्यानंतर घाबरुन ते पळून जाऊ लागले. वेगाने जात असताना पुढे सुमारे २०० मीटरवर एक वळण होते. अंधारात चालक विशाल याला त्याचा अंदाज आला नाही व वेगामुळे त्याचे नियंत्रण सुटून गाडी नाल्यात पडली.

अपघात झाल्यानंतर तेथून कल्पेश ठाकूर व मयूर पाटील हे जात होते़ त्यांनी अपघात पाहून नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले व त्यांच्या रुग्णवाहिकेतून पेण उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यानी अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्रथम पेण उपजिल्हा रुग्णालयात व नंतर पनवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये पाठविले असून जखमींची प्रकृती सुधारत आहे. जखमींचे नातेवाईक अद्याप येथे पोहचले नसल्याने अधिक माहिती नसल्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले. पेण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अपघात झाल्यानंतर जखमींना वाचविण्याऐवजी तेथून पळून जाताना ते स्वत:च अपघातात सापडले व त्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. इतरांनी त्यांना मदत केली नसती तर, त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नसते.