यवतमाळमध्ये पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना यवतमाळ शहारापासून सात किलोमीटर अंतरावर घडली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. विशाल आडे आणि वृषभ कनाके अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पाऊस पडत असल्याने निळोणा धरण तुडुंब भरुन ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हे धरण बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास विशाल आडे आणि वृषभ कनाके हे दोघे मित्र निळोणा धरणावर गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तलावातील पाणी बघताना त्यांना या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी दोघेही मित्र पाण्यात उतरले. मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्या कारणाने एक जण पाण्यात बुडू लागला. ते लक्षात येताच दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघेही खोल पाण्यात बुडाले. यावेळी काही उपस्थितांनी आरडा ओरड केला. त्यानंतर बुडालेल्या तरुणांच्या शोधकार्याला सुरुवात केली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांचाही शोध लागू शकला नाही. याबाबतची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले होेते.