अखेर खा. उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम ! सातार्‍याच्या विकासासाठी दि. 14 ला दिल्लीत PM मोदी, HM शहांच्या उपस्थितीत BJPमध्ये प्रवेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या तिसऱ्या मेगाभरतीमध्ये उदयनराजे हाती कमळ घेतील, असं बोललं जात होतं. त्यावळी त्यांनी यु-टर्न घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. अखेर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (दि.१४) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून NCP चा राजीनामा दिल्यानंतर ते रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी आज (दि. १२) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मला भाजपमध्ये जावे लागत आहे. तुमच्या विषयी माझ्या मनात सदैव आदर असेल, तुमचे आशीर्वाद असुद्या असे म्हणत उदयनराजे यांनी शरद पवारांचा निरोप घेतला. उदयनराजे भोसले येत्या 14 तारखेला दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी मोठा जबर धक्का बसला आहे.

उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली होती. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे ? याबाबत त्यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा केली होती.