‘कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या’, E-Pass च्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सर्व स्तरातून अशी मागणी केली जात आहे की, आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची सक्ती मागे घ्यावी. केंद्राच्या आदेशानंतरही राज्य सरकारनं मात्र ई पासची सक्ती कायम ठेवली आहे. यामुळं आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून सरकारवर टीका केली होती. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “पती पत्नी घरी एकत्र राहू शकतात, परंतु स्कुटरवर एकत्र बसू शकत नाही. अनोळखी लोकांसोबत प्रवास करायला मुभा दिलीय तर मग एकाच कुटुंबाल एकत्र जायला बंदी का ? उद्धव सरकार देखील मोदींच्या पावलावर पाऊल टाकायला लागलं आहे.”

पुढे बोलताना आंबेडकर म्हणतात, “लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बद करा. कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उद्भवलेल्या पूर स्थितीकडे गांभिर्यानं लक्ष द्यावं. राज्यावर मोठं संकट येईल.”असंही ते म्हणाले आहेत.

केंद्र सरकारनं ई पासची सक्ती मागे घेण्यास सांगितलं आहे. तरीही राज्यातील स्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं गृहमत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं.