IPS अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत अद्याप ठोस निर्णय नाही, पोस्टींगवर अनिश्चिततेचे सावट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. तो कधी होणार, ते देखील स्पष्ट झाले नाही. त्यामुळे बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मागे पडला. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात बदल्यांचे वारे वाहू लागले. मिशन बिगेन अगेनमुळे हे वारे गतिमान झाले. परंतु बदलीचा विषय मागे पडत असल्याने उत्सुक अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामधील चर्चेनुसार, 1 ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे. मात्र, एकमत न झाल्यामुळे ती तशीच पडून आहे. सुरुवातीला आयोध्या राम जन्मभूमी पूजनाचा सोहळा पार पडल्यानंत बदल्या जाहीर करण्याचे ठरले होते. त्यामुळे 6 ऑगस्ट पासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपली तयारी करुन ठेवली. आज होणार, उद्या होणार असे निरोप मिळत असल्याने अनेकजण एकमेकांना फोन करून या संदर्भात विचारणा करत आहेत.

मात्र, शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना 15 ऑगस्टच्या आत बदल्या होतील असे सांगितले. हे सांगताना सगळा विचार विमर्श करून बदलीचा निर्णय घेण्यात येईल असे सांगून अद्याप आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत काही निश्चित झाले नसल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. 15 ऑगस्ट आणि गणेशोत्सव बंदोबस्त बदली झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना सूट होईल का, अशी शंका घेतल्यानंतर त्यांनी यावर बोलणे टाळले. यावरूनच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अद्यापही अनिश्चित्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.