धावत्या रेल्वेतून प्रवाशी पडला, ट्रेनखाली जाणार तितक्यात जवानांनी वाचवले प्राण (व्हिडीओ)

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण रेल्वे स्थानकावर एक भयंकर अपघात घडला असून प्रवाशाच्या चुकीमुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र रेल्वे संरक्षण गार्ड्सच्या प्रसंगवधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत एक प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडला. प्रवासी ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये घसरत गेला, मात्र तेवढ्यात स्थानकावर उभा असलेल्या जवानाने प्रवाशाला मागे ओढून त्याचे प्राण वाचविले.

स्टेशन ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान साहू आणि महाराष्ट्र सुरक्षा बल सोमनाथ महाजन यांनी प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावले होते. ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचविण्यात दोन्ही सैनिकांना यश आले. ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना रेल्वेने म्हटले आहे की, कृपया चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका. हे प्राणघातक ठरू शकते.