Pune News : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतील शाखा अभियंता विजय मराठे 40 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आश्रम शाळेत कनेक्शन देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या शाखा अभियंत्यास एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई स्वारगेट परिसरात झाली आहे.

विजयकुमार रामचंद्र मराठे (वय 52) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मराठे हे स्वारगेट येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या क्रमांक दोन कार्यालयात शाखा अभियंता आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांची आश्रम शाळा आहे. त्यांना नळ कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक मराठे याने तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्याबाबत त्यांनी एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. आज सापळा कारवाईत मराठे यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.