‘आपल्यासाठी मंत्रीपद महत्वाच नाही, ओबीसी समाज महत्वाचा’ ! अन्याय किती सहन करायचा ?

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन – ओबीसी (OBC) समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का ? असा थेट सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. मंत्रिपद महत्त्वाचं नाही, अन्याय किती सहन करायचा. त्याला काही मर्यादा असतात, असेही विजय वडेवट्टीवार यांनी म्हटले आहे. कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मराठा समाजाच्या 12 टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह (OBC) इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे. त्यांना वेठीस धरायला नको, असंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.

वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरावर अन्याय नको, अशा भावनांही वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही तर ओबीसी समाज महत्त्वाचा आहे. ओबीसीसह इतर समाजातील विद्यार्थी नोकरी मिळावी, याची वाट बघत आहेत. त्यांच वय वाढत चालल आहे. त्यांना न्याय कुणी द्यावा, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजासाठी नोकरभरती सुरु करावी, या मागणीसाठी ओबीसी समाज जर रस्त्यावर उतरला तर आपणही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, देशात जातीच्या लोकसंख्येनुसार त्या त्या वर्गासाठी आरक्षण द्यावे. देशात ज्या समाजाचे जेवढे प्रतिनिधित्व, त्या समाजाला तेवढे टक्के आरक्षण द्यावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.