विखे-जगतापांचा छुपा प्रचार सुरू ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काल सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही भाजपचे उमेदवार सुजय विखे व राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी छुपा प्रचार सुरू केला आहे. वैयक्तिक भेटीगाठी व कार्यकर्त्यांकडून भ्रमणध्वनीवर संपर्क करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या नेत्यांनी नगरची जागा प्रतिष्ठा केल्यामुळे छुपा प्रचाराने गती घेतली आहे.

उद्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी 2 हजार 30 मतदान केंद्रावर मतदान होईल. रिंगणात 16 उमेदवार असले, तरी राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या.

तसेच काँग्रेसचे स्टार प्रचारक असूनही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप उमेदवार असलेल्या पुत्र सुजय विखे यांचा प्रचार केला. राष्ट्रवादीच्या आमदार जगताप यांच्यासाठीही शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातले होते. दोन्ही पक्षांच्यावतीने नगरची जागा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे जाहीर प्रचार थंडाविलेला असला, तरी वैयक्तिक, छुपा प्रचाराने जोर धरला आहे. वैयक्तिक भेटीगाठी, भ्रमणध्वनीवरून संपर्क करून मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदारसंघाबाहेरच्या कार्यकर्त्यांना मतदानाच्यापूर्वी 48 तास वास्तव्य करता येणार नाही, असे आचारसंहिता कक्ष प्रमुख निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींना कळविलेले आहे. आचारसंहिता भंग होणार नाही व इतर सावधानता बाळगून छुप्या पद्धतीने दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा जोर धरला आहे.