बॉलिवूडच्या ‘त्या’ गायकानं विचारला केंद्र सरकारला प्रश्न, म्हणाला – ‘टाळया अन् थाळया झाल्या, आता डीजे वाजवायचा का ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड गायक व संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया द्यायला मागे नसतात. यावेळी त्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधत म्हटले कि, करोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का?

करोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनला तरीही करोना नियंत्रणात आला नाही. उलट लॉकडाउनमध्येच देशभरातील लाखो लोकांना करोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर विशाल दादलानी याने ट्विट करुन केंद्र सरकारवर टीका केली. “शेठ, देशात ५०० करोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?” असं ट्विट करत त्याने उपरोधिक टोला मारला आहे.

प्रत्येक तासांला एक हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येतात. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे.

एका दिवसातील ही आतापर्यंतची मोठी वाढ आहे. देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झालेत. गेल्या २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.