पुणे मनपात नोकरीच्या अमिषाने अनेकांना गंडा ; मजदूर संघटनेच्या अध्यक्षाला अटक

पुणे मनपातील काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार : पोलीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून बेरोजगार तरुणांना तब्बल ४३ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात महानगर पालिकेतील मोठा घोटाळा समोर आला असून महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी सांगितले.

सतिश वसंत लालबिगे (रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद एकनाथ शिंदे (वय २७, रा. स्वारगेट पोलीस वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शिंदे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. ते बेरोजगार आहेत. त्यांना हनुमंत मिसाळ या महापालिकेतील वार्डनने भारतीय कामगार मजदूर संघटना अध्यक्ष म्हणून असलेल्या सतीश लालबिगे याच्याशी भेट घालून दिली. लालबिगे याने महापालिकेत जागा रिक्त आहेत. त्या संघटनेच्या वतीने भरण्यात येणार आहेत. त्याला शाससाने परवानगी दिली असून केसचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. न्यायालयाच्या कामासाठी आलेला खर्च तुम्हाला देणे बंधनकारक आहे. असे म्हणून पैशांची मागणी केली. त्यानंतर ते पैसे विजय भोंडवे याच्याकडे देण्यास सांगितले. त्याने शिंदे यांच्याकडून नोकरीचा अर्ज लिहून घेतला. त्यांच्याकडून एकूण १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून टाळाटाळ सुरु केली. त्याने अशा प्रकारे दीपक शिवाजी राऊत (भोर) यांच्याकडून १२ लाख रुपये, रमेश बबन पायगुडे (काळेवाडी) ४ लाख रुपये, अश्वीनी केशव सुर्यवंशी यांच्याकडून ६ लाख रुपये, सागर राजेंद्र चिखलकर यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये, भारत बाबू इंगळे यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले. या सर्वांना नोकरी लावण्याच्या अमिषाने एकूण ४३ लाख ०४ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर याप्रकरणी सर्वांनी पोलिसांत धाव घेतली. लालबिगे याच्यावर अशा प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान बुधवारी रात्री सतीश लालबिगे याला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेतील मोठा घोटाळा यानंतर उघडकिस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणात महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. लालबिगे आणि भाोंडवे या दोघांनी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी केले आहे.