किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या ‘दबंग’ संगीतकार वाजिद खान यांचं 42 व्या वर्षी मुंबईत निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   ‘प्यार किया तो डरना क्या’ पासून आपल्या संगीताचा जलवा सुरु करणाऱ्या ‘साजिद-वाजिद’ या जोडगळीतील संगीतकार व गायक वाजिद खान यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या विकाराने आजारी होते. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. परंतु, त्यातूनही त्यांची प्रकृती सावरु शकली नाही. काही दिवसांपूवी त्यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्याने चेंबूर येथील सुराना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवार सायंकाळपासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. रात्री यांचे निधन झाले़ अत्यंत कमी वयात वाजिद खान यांनी बॉलिवूडमध्ये उत्तम यश संपादन केले होते.

साजिद वाजिद या संगीतकार जोडगळीने १९९८ मध्ये सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्यापासून आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, दबंग अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. या जोडीने संगीत दिलेली जवळपास सर्वच गाणी सुपर हिट ठरली आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सलमान चे प्यार कोरोना आणि भाई भाई गाणेही वाजिद खान यांनी कंपोझ केले होते.  संगीतकार सलीम मर्चेट यांनी ट्वीट करुन वाजिद खान यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाजिद भाई तू खूप लवकर निघून गेला. आमच्या घराण्याचे मोठे नुकसान झाले.

प्रियंका चोपडा हिनेही वाजिद यांचे हसणे कायम लक्षात राहील. ते नेहमी हसतमुख असायचे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.