‘कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावे लागते’, उपमुख्यमंत्री पवारांचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्यातील अंतर्गत वादामुळेच पडणार असल्याचा दावा भाजप वारंवार करत आहे. भाजपच्या या दाव्यावर महाविकास आघाडीनेही सरकारला कुठलाही धोका नसून, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहील, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनीही भाजपच्या या दाव्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार काहीही झाले तरी पडणार नाही. आमदार आणि कार्यकर्ते चलबिचल होतात, म्हणून कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावे (show-carrots-protect-workers) लागते. त्यामुळे विरोधक सतत तसे बोलत असल्याचे विधान करत पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

कराड येथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (दि. 25) उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रीतिसंगम या ठिकाणी जाऊन त्यांच्या समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असे विधान केले आहे. फडणवीसांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. सत्ता गेल्यानंतर त्रास होतो मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द न वापरणारेही वापरायला लागतात. त्यामुळे ते गांभीर्याने घेऊ नये.

त्यांची सत्ता गेल्याने ही अवस्था झाली आहे. माणसाने आशा ठेवावी, असा टोला शरद पवार यांनी फडणवीस यांना लगावला होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मिळणारा सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आले आहे. या नैराश्येतूनच हे सर्वकाही होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी भाजपवर केली आहे.

You might also like