… तर आम्ही शिवसेनेला साथ देऊ : भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुस्लीम आरक्षणावरून महाविकास आघाडीत मदभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुस्लिम आरक्षणासाठी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देऊन शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेला साथ देऊ असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्याने सध्या महाविकास आघाडीत मदभेत निर्माण झाले आहेत.

मुस्लिम आरक्षण संदर्भातील प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही, जेव्हा येईल त्यावेळी वैधता तपासून निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार असल्याची घोषणा केली आहे. याच मुद्यावरून सध्या महाविकास आघाडीत मतभेदाचे चित्र आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे संविधानानूसार बोलत आहेत. धर्माच्या आधारे आरक्षण देण्याबाबत संविधानात कुठेही सांगण्यात आलेले नाही. धर्माच्या आधारेच आरक्षण द्यायचे असेल तर मग शिखांनी काय चूक केली. असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने आधीच सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यात मुस्लिम येतातच, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तर त्यांनी चिंता करू नये भाजप त्यांना साथ द्यायला तयार आहे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुस्लिम आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.