भाजपच्या ‘या’ महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना लगावला ‘खोचक’ टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला हजरी लावली, मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. मात्र, अभिनंदन करत असताना त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्याचवेळी महाविकास आघाडीबद्दल खोचक टोला लगावला आहे. “तीन चाकाची ही गाडी कुठवर चालते ते पाहू. फक्त शरद पवार ही अनैसर्गिक आघाडी एकत्र ठेऊ शकतात. काँग्रेसकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. ते फक्त दिल्लीमधून हे सर्व पाहत आहेत”, असे पूनम महाजन यांनी म्हटले आहे.

1990 च्या दशकामध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये युती घडवून आणण्यात प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता युती तुटली असली तरी प्रमोद महाजन यांच्या दूरदृष्टीमुळेच ही युती प्रत्यक्षात आली होती. आजही ठाकरे आणि महाजन कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याच भावनेतून पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचवेळी त्यांनी हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचित केले आहे.

Visit : Policenama.com