कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना कोर्टाचा मोठा दणका !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदुरे व भरत कुरणे या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज सुनावणींती न्यायालयाने सोमवारी (दि.24) फेटाळला. या अर्जाची जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत सचिन अंदुरे, भरत कुरणेसह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन, 19 जणांना अटक केली आहे. आकोळकर व पवार हे दोघे अद्याप पसार आहेत. त्यांचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे. याच दरम्यान अटक करण्यात आलेल्या अंदुरे आणि कुरणे या दोघांनी जामिनावर सुटका करावी, याकरिता कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.

आज कोर्टात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद केला. तो युक्तीवाद ग्राह्य मानत कोर्टाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल देताना आरोपींच्या विरुद्ध सकृतदर्शनी पुरावा असल्याने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

युक्तीवादावेळी संशयित आरोपी अंदुरे व कुरणे यांचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येमध्ये सहभाग आहे. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील यांनी केली होती. तर अंदुरे आणि कुरणे यांचा पानसरे हत्या प्रकरणी कुठेही संबंध दिसत नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.