मोदींचा चित्रपट लोकांनी का पहावा ? भारतासाठी असं काय केलंय ?

ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

कूच बेहार : वृत्तसंस्था – जनतेने मोदींचा चित्रपट का पहावा ? भारताच्या विकासात मोदींचं असं काय योगदान आहे ? जर लोकांना चित्रपटच पहायचे असतील तर ते गांधीजी, आंबेडकर यांच्यावर आधारीत पाहतील. असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चीम बंगालच्या कूच बेहार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावरून ममतादीदींनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काल पंतप्रधान मोदी यांनी सिलगुर येथील जाहीर सभेत ममता या ‘स्पिडब्रेकर’ असल्याचा आरोप केला होता. त्यावर ममता यांनी मोदींना ‘एक्सपायरी बाबू’ म्हटलं होतं. तर आज मोदींच्या चित्रपटावरून निशाणा साधला आहे. त्यामुळे सध्या मोदी आणि ममता यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक चकमक रंगली आहे. आता नरेंद्र मोदी याला कसे प्रतिउत्तर देतात हे पाहण औत्स्युक्याचं ठरणार आहे.