काय आहे अमोनियम नायट्रेट ? ज्यामुळे हादरले बेरूत शहर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लेबनानची राजधानी बेरूत येथील बंदराजवळील एका गोदामात मोठा स्फोट झाला. ज्यामुळे ७० हून अधिक लोकांचा जीव गेला. ४००० हून अधिक लोक जखमी आहेत. अशी माहिती समोर येत आहे की, ज्या गोदामात स्फोट झाला, तिथे गेल्या ६ वर्षांपासून जप्त केलेले अमोनियम नायट्रेट ठेवले जात होते. हा स्फोट इतका मोठा होता की, २४० किलोमीटरवर सायप्रसपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. पण हे अमोनियम नायट्रेट काय आहे, ज्यामुळे हा मोठा स्फोट झाला.

अमोनियम नायट्रेट एक गंधरहित केमिकल आहे. जे बर्‍याच कामांमध्ये वापरले जाते. मात्र बहुतेक दोन कारणांसाठी वापरले जाते. प्रथम शेतात खत म्हणून आणि दुसरे म्हणजे खाण किंवा बांधकामांत स्फोट करण्यासाठी.

हे अत्यंत स्फोटक केमिकल आहे. आग लागल्यावर यामुळे मोठा स्फोट होतो. त्यानंतर घातक वायू बाहेर पडतो, ज्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया गॅसचा समावेश आहे.

अमोनियम नायट्रेट हे ज्वलनशील केमिकल आहे, म्हणून जगभरात त्याच्या देखरेखीसाठी कठोर नियम बनवले गेले आहेत.

या नियमांमध्ये विशेषत: या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की, ज्या स्टोअरमध्ये अमोनियम नायट्रेट ठेवले जात आहे ते पूर्णपणे अग्निरोधक असले पाहिजे. तेथे कोणतेही कॅनल, पाईप किंवा गटार असू नये. कारण काही वेळा तापमान आणि इतर रासायनिक रिएक्शनमुळे देखील स्फोट होऊ शकतो.

लेबनानमधील स्फोटानंतर गोदामात ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटला आग कशी लागली, याचा तपास केला जात आहे.

लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी गोदामाला धोकादायक म्हटले आहे. हे गोदाम २०१४ मध्ये बांधले गेले होते. ते म्हणाले की, या घटनेस जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. लेबनानचे राष्ट्रपती मिशेल आऊन यांनी म्हटले आहे की, हे कोणत्याही प्रकारे मान्य केले जाऊ शकत नाही कि २,७५० टन अमोनियम नायट्रेट असुरक्षितपणे कसे ठेवले गेले होते.

अमोनियम नायट्रेटमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. २०१३ मध्ये अमेरिकेच्या टेक्सासमधील फर्टिलायझर प्लांटमध्ये एक स्फोट झाला होता. ज्यामुळे जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला होता. २००१ मध्ये फ्रान्सच्या टुलूस येथेही एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाला होता. या अपघातात ३१ जण मारले गेले होते.