उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय ? राज्यसभेसाठी संजय काकडे उघडपणे मैदानात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदारांची 2 एप्रिलला मुदत संपेल. यात शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजप), राजकुमार धूत (शिवसेना), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे ( भाजप सहयोगी), हुसेन दलवाई (काँग्रेस) यांचा समावेश आहे. दरम्यान आता संजय काकडेंकडून पुन्हा एकदा खासदारकी मागण्यात आली आहे.

संजय काकडे भाजपचे सहयोगी खासदार आहेत. आज पत्रकार परिषद घेत संजय काकडेंनी आपण पुन्हा खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. तसेच आपण सहयोगी नाहीत तर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहोत, पुणे महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या जोरावर, मेरिटवर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला 100 टक्के खात्री आहे असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी उदयराजेंच्या उमेदवारीवर भाष्य केले. ते म्हणाले की पडलेल्या माणसाला मंत्रिपद कसे मिळेल, उदयनराजेंचे योगदान काय आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

उदयनराजेंची राज्यसभेत उमेदवारी फायनल करण्याची गरज नाही, घाई करण्याची गरज नाही. उदयनराजेंचे पक्षात काही मोठे योगदान नाही. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, ते पक्षात आले आणि पडले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे भाऊ वगळता भाजपचा इतर कुणी आमदारही जिंकू शकला नाही. त्यामुळे इतक्या लवकर पक्ष पातळीवर काही निर्णय झाला असेल असे मला वाटत नाही.

संजय काकडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली की मी फडणवीसांना भेटलो आहे आणि तुम्हीच माझ्या वतीने पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना भेटा असे मी फडणवीसांना सांगितले आहे. फडणवीसांना आपण भेटलो आहोत आणि त्यांच्यावर आपला विश्वास आहे असेही संजय काकडे म्हणाले.

परंतु महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली इच्छा व्यक्त केली.

You might also like