रामदास आठवलेंच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांची अचानक ‘एन्ट्री’, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे संपूर्ण देशात अशांतता पसरली आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत आणि या आंदोलनांना हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक सारखे प्रकार घडत आहेत. असे असताना आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडत आहेत. त्यासाठी त्यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये आठवले यांनी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत आठवलेंनी केंद्राच्या निर्णयाचं जोरदार समर्थन करत राज्य सरकारवर टीका केली.

आज पुण्यात विविध कार्यक्रमांसंदर्भात देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असताना कार्यक्रम संपवून ते भेटीगाठींसाठी पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये आले होते. नेमकी त्याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद सर्किट हाऊसमध्ये सुरू होती. आणि हे फडणवीसांना कळताच त्यांनी आठवलेंची भेट घ्यायचं ठरवलं. पत्रकार परिषदेत अचानक देवेंद्र फडणवीस आल्याने आठवलेंनाही आश्चर्य वाटलं.

आठवले पत्रकार परिषद घेत असताना अचानक मध्येच देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी आठवलेंना हस्तांदोलन केले. असे अचानक आल्याचे कारण आठवलेंना त्यांनी सांगितले आणि लगेच कोल्हापूरला जायचं असल्यामुळे जास्त काही न बोलता रवाना झाले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न केल्यावर त्यांनी सांगितले की आताच मी कुठल्याही प्रश्नांची उत्तर देणार नाही. उद्या पत्रकारांशी बोलणार आहे असे सांगत ते कोल्हापूरसाठी रवाना झाले.

काय म्हणाले रामदास आठवले?
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कर्जमाफी केली पण पैसे कुठून आणणार, सातबारा कोरा का नाही केला. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला समर्थन त्यांनी दाखवले. तसेच काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळं व्हावं, असा सल्ला देत मंत्रिमंडळ विस्तार कधी? असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

आठवलेंनी दिला आंदोलनाचा इशारा
आठवलेंनी सांगितले की शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांची देखील राज्य सरकारने कर्ज माफी करावी. ही कर्जमाफी झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच CAA आणि NRC बद्दल त्यांनी सांगितले की, देशभरात होणारे आंदोलनं ही गैरसमजातून होत असून हा कायदा मुस्लिम विरोधी नाही. आंदोलनकर्त्यांना चिथवण्यात येत आहे हे लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी असे आवाहन देखील त्यांनी मुस्लिमांना केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/