२००० रुपयाची लाच घेताना सहायक फौजदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ADV
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेजाऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यासाठी २ हजार रुपयाची लाच स्विकारताना जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

चारुदत्त आत्माराम घोरपडे (सहायक फौजदार, नेमणूक जयसिंगपूर पोलीस ठाणे, कोल्हापूर) असे रंगेहाथ पकण्यात आलेल्या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांनी तक्रारदार यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. याचा वाद न्यायालयात सुरु होता. न्यायालयाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. आतिक्रमण काढण्यासाठी तक्रारदारांनी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. चारुदत्त घोरपडे याने पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अनुकुल अहवाल सादर करावा लागत असल्याचे तक्रारदारांना सांगितेल. अहवाल सादर करण्यासाठी घोरपडे याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली.

ADV

तक्रारदाराने लाच देण्याचे कबूल करुन याची तक्रार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने तक्रारीची पडताळणी करुन पोलीस ठाण्यात सापळा रचला. त्यावेळी घोरपडे याला दोन हजार रुपयाची लाच स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. घोरपडे विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.