नीरा नदीवरील पुलाच्या साइडपट्ट्यांंची स्वच्छता केव्हा करणार ?, प्रवाशांसह नीरेतील नागरिकांचा सवाल

नीरा – पोलीसनामा ऑनलाइन : पुणे – सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या पुलाच्या साइडपट्टी व फूटपाथमध्ये साठलेेली माती, कचरा व गवत, तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला मोठी झाडे-झुडपे वाढल्याने दुचाकीस्वारांसह पायी चालणाऱ्यांंना अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नीरा नदीवरील पुलावरील स्वच्छता केव्हा करणार, असा सवाल प्रवाशांसह नीरेतील नागरिकांनी केला आहे.

पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या नीरा नदीवरील मोठ्या पुलावरून साताराहुन नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठी संख्या आहे. तसेच पुणेहून पंढरपूरकडे जाणारीही वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी माऊलींंच्या पालखी सोहळ्यादरम्यान या पुलावरील साइडपट्ट्यांची स्वच्छता केली जाते, तसेच पुलाची रंगसफेदी केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने नीरा नदीवरील नवीन पुलाची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे पूल अस्वच्छ झालेला आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे, मुंबई, नगर, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरातून आपल्या गावी जाणा-या प्रवाशांची संख्या मोठी असून, हे प्रवासी जवळचा मार्ग म्हणून नीरा नदीवरील पुलावरून प्रवास करीत असतात. तसेच नीरा गावातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती दररोज सकाळी व संध्याकाळी पाडेगावकडे फिरण्यास जात असतात. त्यांना जीव मुठीत घेऊन या पुलावरून जावे लागत आहे. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे- झुडपे वाढल्याने दिशादर्शक फलक दिसत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी या पुलावरून जाणा-या नवीन अवजड वाहनाच्या चालकाला दिशादर्शक फलक दिसला नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याचा संभव आहे. एखादा मोठा अपघात झाला, तरच पुुलाच्या स्वच्छतेकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांसह नागरिक करीत आहेत.

दरम्यान, लोणंद बाजूने नगरकडे जाणा-या वाहनचालकाला पूल सुरू होण्यापूर्वी पूल संपल्यानंतर कोणत्या मार्गाने नगरकडे जायचे हे समजत नसल्यामुळे लोणंद बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी पाडेगाव (ता.खंडाळा) च्या हद्दीत पुणे, नगर, बारामतीकडे जाण्याचा मार्ग व किलोमीटर दर्शविणारा फलक लावण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.