Coronavirus : देशातील 24 तासात 1718 नवे रुग्ण तर 67 जणांचा मृत्यू, ‘कोरोना’बाधितांची संख्या 33 हजार ‘पार’, आतापर्यंत 1074 बळी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  देशातील कोरोना बाधितांची संख्या दररोज दीड हजारांहून अधिकच्या संख्येने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात १ हजार ७१८ नवीन लोकांना कोराना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या आता ३३ हजार ५० झाली आहे. त्यात २३ हजार ६५१ लोक सक्रीय आहेत.

गेल्या २४ तासात देशात ६७ जणांचा मृत्यु झाला असून कोरोनामुळे देशात आतापर्यंत १ हजार ७४ जणांचा मृत्यु झाला आहे. देशभरात बुधवारी दिवसभरात ६२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत देशातील ८ हजार ३२५ रुग्ण बरे झाले आहेत.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ९ हजार ९१५ कोरोना बाधित रुग्ण आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. गुजरातमध्ये बुधवारी दिवसभरात ३३८ नवीन रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत गुजरातमध्ये ४ हजार ८२ कोरोना बाधित रुग्ण झाले आहे.

दिल्ली ३ हजार ४३९, मध्य प्रदेश २ हजार ५६१, राजस्थान २ हजार ४३८, तामिळनाडु २ हजार १६२, उत्तर प्रदेश २ हजार १३४, आंध्र प्रदेश १ हजार ३३२, तेलंगणा १ हजार १२ आणि पश्चिम बंगाल ७५८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. देशातील ९ राज्यात जवळपास ९० टक्के कोरोना बाधित रुग्ण आहेत.