पिंपरी : फिर्यादी केयरटेकर महिलाच निघाली चोरटी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – एलआयसी एजंटने बांगड्या काढून नेल्याचा बनाव करणाऱ्या महिला केअरटेकरचे पितळ पोलिसांनी उघडे केले आहे. कर्ज फेडण्यासाठी केयरटेकर महिलेने ही चोरी केली असून पोलिसांनी महिलेस अटक केली आहे.

रंजना सुरेश उत्तेकर (40, रा. इंद्रायणी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना ही महिला ग्यानीबाई मुलचंद रामनानी (88) यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करत होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून एका चोरट्याने घरातील वृद्ध महिलेच्या हातातून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून नेल्या, अशी फिर्याद रंजना हिने दिली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच ग्यानीबाई यांचा देखील जबाब घेतला. मात्र, त्यांच्यासोबत असा प्रकार झाला नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात सांगितले. त्यामुळे पोलिसांचा रंजना हिच्याबाबत संशय बळावला. त्यामुळे रंजनाला पोलीस ठाण्यात बोलावून तिच्याकडे कसून चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्नांसमोर रंजनाचे पितळ उघडे पडले.

तिच्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी तिला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तिनेच ग्यानीबाई यांच्या तीन तोळ्यांच्या सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या आणि चोरीचा बनाव रचला. पोलिसांनी सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत. रंजनाची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, गणेश करपे, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, सोमेश्वर महाडिक यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/