CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांना ‘लाठीचार्ज’ करुन जबरदस्तीने हटविलं

कानपूर : वृत्तसंस्था – सीएए विरोधात गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असलेले धरणे आंदोलन संपल्याचे घोषित केल्यानंतरही धरणे धरणाऱ्या महिलांना सोमवारी सकाळी जबरदस्तीने तेथून हटविले आहे. शहरातील चमनगंज येथील मोहम्मद अली पार्कमध्ये धरणे देणाऱ्या या महिलांवर लाठीचार्ज करीत सर्वांना तेथून हकलून लावण्यात आले आहे.

पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असलेले हे धरणे आंदोलन शनिवारी मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतरही सुमारे १०० महिला तेथेच बसून राहिल्या होत्या. पोलिसांनी तसेच आंदोलनकर्त्यांनी या महिलांना तेथून घरी जाण्यास सांगितले होते. मात्र, या महिलांनी तेथून उठण्यास नकार दिला.

त्यामुळे पहाटे ५ वाजल्यापासून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली़ त्यावेळी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करुन सर्व महिलांना पार्कमधून बाहेर काढले. त्याअगोदर पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (रासुका) खाली कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी आंदोलन मागे घेण्यात आले होते.