वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप : मेरी कोमचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये हारल्यानंतर कांस्य पदकावर ‘समाधान’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – रशियातील उलान उदे शहरात सुरु असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आज झालेल्या सामन्यात मेरी कॉमला सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आता तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे. सेमीफायनलमध्ये तिचा सामना तुर्कीच्या बुसेनाज साकिरोग्लू हिच्याशी झाला होता. या सामन्यात तिला 1-4 ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे तिचे सातवे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न देखील भंगले.

मात्र पंचांच्या निर्णयाविरोधात भारताने तक्रार केली असून सदोष पंचगिरी झाल्याचा आरोप भारताने केला आहे. याआधी तिने सेमीफायनलमध्ये प्रवेश करून आपले आठवे पदक नक्की केले होते. क्वार्टरफायनलमध्ये तिने कोलंबियाच्या इंगोट वालेंसिया हिच्यावर 5-0 अशी मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. ४८ किलोग्रॅम वजनाच्या स्पर्धेत सहा वेळा पदक जिंकणाऱ्या मेरी कॉम हिचे हे 51 किलोग्रॅम वजनाच्या स्पर्धेत पहिलेच पदक आहे.

याआधी देखील तिने 51 किलोग्रॅम वजनाच्या गटात 2014 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर 2018 मधील स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये देखील तिने याच गटात कांस्यपदक देखील जिंकले होते.दरम्यान, तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल्स जिंकले असून ती भारताच्या संसदेत राज्यसभा खासदार देखील आहे.

Visit : Policenama.com