होय ! ‘स्वेटर’ नाही ‘रेनकोट’ काढा बाहेर, हिवाळ्यात मुंबईत ‘पाऊस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली असून त्यामुळे गुरुवारी पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वेटर बाहेर काढण्याऐवजी रेनकोट, छत्री बाहेर काढण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. अरबी समुद्रात एकाचवेळी दोन कमी दाबांचे क्षेत्र निर्माण झाली आहे. येत्या १२ तासात यांचे पवन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. याचा परिणाम मुंबईत गुरुवारी पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

लक्ष्यद्वीप बेटे आणि विषववृत्ताजवळ अशा दोन ठिकाणी ही चक्रीवादळे निर्माण झाली आहेत. यंदा अरबी समुद्रात एकाचवेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची ही दुसरी वेळ आहे. या वर्षात अरबी समुद्रात ७ चक्रीवादळे निर्माण झाली असून आजवरच्या इतिहासात हा एक विक्रम आहे. विषववृत्ताजवळच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पवन चक्रीवादळात रुपांतर झाले असून ते सोमालिया, येमनच्या दिशेने जात आहे. तसेच लक्ष्यद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र सध्या मुंबईपासून ६९० किमी आणि पणजीपासून ६५० किमी दूर समुद्रात आहे.

ते पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र समुद्रातच शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रासह, कर्नाटक व अरबी समुद्राच्या किनारपट्टी परिसरात हलक्या पावसाची गुरुवारी शक्यता आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण अरबी समुद्र खवळलेला राहणार असून किनाऱ्यांवर जोरदार लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये. तसेच पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.