‘कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला. यावेळी अजित पवारांचा सन्मान करत त्यांच्या हातात गदा देण्यात आली. यावेळी अजित पवारांनी देखील स्वत:वरच विनोद केला.

अजित पवार म्हणाले की, पैलवानाला गदा दिली जाते परंतु आज पहिल्यांदा कधीही कुस्तीचं लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला अनेकदा दिली जाते परंतु तुम्ही दिलेली गदा कुठं ठेवावी आणि कशी धरावी हे मला कळालं नाही असे भाष्य करताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला.

अजित पवार म्हणाले की, गदा पैलवानाच्या खांद्यावर शोभून दिसते, दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर नाही. राज्यातील खेळ अधिकाधिक लोकप्रिय होण्यासाठी काय काय करता येईल यासाठी क्रिडामंत्र्यांसह बैठक घेतली. मुलगा अभ्यासात कमकुवत असला तरी खेळात उत्कृष्ट हवा असं पालकांंना वाटलं पाहिजे. एखाद्या खेळात यश संपादन केल्यानंतर त्याला चांगली नोकरी लावता येईल यासाठी महाविकासआघाडीचं सरकार प्रयत्नशील असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आजपर्यंत पवार कुटूंब फक्त राजकीय मैदानं गाजवतात असा माझा समज होता. परंतु आज हे ही कळालं की पवार कुटूंब कुस्तीचं मैदानही गाजवतात. त्यामुळे पवार येथेही कमी नाहीत हे पुणेकरांनी लक्षात घ्यावं असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ झाला. पुण्यात आज मोठी वाहतूक कोंडी झाली, सत्कार समारंभामुळे गर्दी झाली. परंतु नागरिक बोलणार कोणाला, पैलवानांचा कार्यक्रम आहे असा चिमटा देखील अजित पवारांनी काढला.