अट्रॉसिटी दाखल केल्याने धमकावले, तरुणाची आत्महत्या

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन – मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अनुसुचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या तरुणाला धमकी दिल्याने त्याने आत्महत्या केली. याप्रकऱणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अतुल रामलिंग शिंदे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वीरेंद्र रानवडे व इतरांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे़. याप्रकरणी रामलिंग भानुदास शिंदे (वय ४३, रा़ आंबेडकर वसाहत, औंध) यांनी फिर्याद दिली आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल रामलिंग शिंदे (वय १९) याला वीरेंद्र रानवडे व इतरांनी विनाकारण मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली होती़. त्यानंतर अतूल शिंदे याने चतु:श्रृंगी पोलिसांकडे १६ मे रोजी तक्रार दिली होती. याप्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर रानवडे व इतरांनी पुन्हा अतुल शिंदे याला धमकावले. त्यानंतर त्याने १७ मे सकाळी घाबरुन आत्महत्या केली़. याप्रकरणी पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल वीरेंद्र रानवडे व इतरांना अटक केली़. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त देवीदास पाटील हे करत आहेत.