टोळीयुद्धातून सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करून खून

वसमत : पोलीसनामा ऑनलाइन – वसमत येथील बुधवार पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेत मयत सराईत गुन्हेगाराचा साथीदार जखमी झाला आहे. शिवा सवदा (वय-३०) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आपसातील वाद आणि टोळी युद्धातून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे वसमतमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत नांदेड रोडवरील माळव पाटीवरील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. यामध्ये एका टोळक्याने धारदार शस्त्राने शिवा आणि त्याचा साथीदार श्रीकांत सांडे (वय-१९) यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच शिवाचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले.

मृत शिवा आणि जखमी श्रीकांत यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जुन्या वादातूनच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी श्रीकांत सांडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रभाकर क्षीरसगार, रामा क्षीरसागर, भरत क्षीरसागर, सोनू क्षीरसागर, अमोल क्षीरसागर आणि भागवत जाधव यांनी हल्ला केल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वसमत पोलीस करीत आहेत.