‘तृणमूल काँग्रेसचे 62 आमदार संपर्कात, 15 दिवसांत ममता बॅनर्जी सरकार कोसळणार’, भाजपचा दावा

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत. तृणमूल काँग्रेसचे 62 आमदार आमच्या संपर्कात असून, येत्या 15 डिसेंबरपर्यंत ममता सरकार पडणार असल्याचा दावा भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने तृणमूलचे 62 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून पश्चिम बंगालमधील वातावरण तापवले आहे. मात्र, भाजपचेच तीन ते चार खासदार आणि काही नेते तृणमूलच्या संपर्कात असल्याचा दावा करून तृणमूल काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, भाजपकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

सौमित्र खान म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे 62 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते कधीही पक्ष बदलू शकतात. आम्ही 15 डिसेंबरपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडणार आहोत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांना सरकार चालवणे कठीण जाणार आहे. सौमित्र खान यांनी कालही एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी सरकार अस्थिर झाल्याचा दावा केला होता. राज्यपाल जगदीप धनखड हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात, असा दावा केला होता.

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी सरकारमधील बलाढ्य मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शुभेंदू अधिकारी हे आता तृणमूल काँग्रेस सोडून भाजपत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. शुभेंदू अधिकारी हे मिदनापूरमधील बलाढ्य नेते आहेत. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.

You might also like