दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखाची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने कारवाई केली. मुंबई, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई मागील दोन दिवसांत करण्यात आली आहे.

शनिवारी (दि.१३) मुंबई आयकर विभागाच्या चौकशी पथकाने दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे कमिशन घेऊन रोख कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या तियुश कावेडिया याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून ४० लाखांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली.

तर निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने दुसरी कारवाई करून ५० लाख रुपयाची रोकड जप्त केली. शनिवारी रात्री सुमारास ताडदेव परिसरात पारसी अगयारी जवळ, सरदार पावभाजी चे पुढील बाजूस, ताडदेव रोड, ताडदेव सर्कल, मुंबई येथे फिरत्या तपासणी पथकाला पाहणी करीत असता, लाल रंगाच्या लॅन्ड रोव्हर (डिस्कवरी) या मोटार कारची (एम.एच.01 सी.एच.0707) तपासणी केली. त्यात प्रशांत रमेशचंद्र समदानी यांच्या कडे ५० लाख रुपये संशयीत रक्कम आढळून आली.
दोन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागामार्फत अधिक तपास सुरु असल्याची माहिती ३१ – मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like